
बेळगाव : वेदांत फाउंडेशनचा हा सन्मान सोहळा म्हणजे, सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपल्यापरीने कार्यरत असणाऱ्या सामाजिक रत्नांच्या कार्याची पोच पावती असल्याचे रोटरी क्लब बेळगाव साउथचे अशोक नाईक म्हणाले.
वेदांत फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदा तीन शिक्षक, तीन पत्रकार आणि तीन पोलीस अशा नवरत्नांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ” वेदांत एक्सलन्स अवॉर्ड ” देऊन सन्मानित करण्यात आले. कणबर्गी येथील महेश फाउंडेशनच्या सभागृहात संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्यात अशोक नाईक समारंभाध्यक्ष या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, समृद्धी सेवा संस्थेचे सचिव वीरेश किवड्सन्नवर, यासह काकडे फाउंडेशन बेळगावचे चेअरमन किशोर काकडे, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आजगावकर, सामाजिक कार्यकर्ते रिजवान नावगेकर, महेश फाउंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यात द हिंदू दैनिकाचे विशेष प्रतिनिधी ऋषिकेश बहादूर देसाई, दैनिक तरुण भारतच्या वरिष्ठ पत्रकार मनीषा सुभेदार व विजय कर्नाटकचे वरिष्ठ पत्रकार महेश विजापूर, शहापूर- बेळगाव येथील सरकारी एमएचपीएस क्रमांक 19 च्या सहाय्यक शिक्षिका सविता चंदगडकर, कणबर्गी येथील सरकारी एमएचपीएस शाळेचे सहाय्यक शिक्षक एन. डी. मादार तसेच बेनकनहळळी येथील सरकारी एमएचपीएसचे सहाय्यक शिक्षक आणि येळळूर क्लस्टरचे माजी सीआरपी ईश्वर पाटील, आणि कॅम्प पोलीस ठाण्यात सेवा बजावणारे पोलीस श्रीधर तळवार, टिळकवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस यल्लाप्पा मुनवळळी, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अप्पांन्ना घरबुडे या नवरत्नांचा वेदांत एक्सलन्स अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल पुष्पहार आणि रोख रक्कम एक हजार रुपये असे वेदांत एक्सलन्स पुरस्काराचे स्वरूप होते. महेश जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
चांगले गुरुच सुदृढ समाज उभारणीसाठी सशक्त मनाच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांची फळी निर्माण करू शकतात. तर सदृढ आणि सशक्त समाज उभारणीत पोलीस आणि पत्रकारांचे कार्य खूपच मोलाचे ठरते. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून वेदांत फाउंडेशनच्यावतीने ” वेदांत एक्सलन्स अवार्ड ” देऊन शिक्षक, पोलीस आणि पत्रकारांचा गौरव करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे काकडे फाउंडेशन बेळगावचे चेअरमन किशोर काकडे म्हणाले. बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनीही यावेळी भाषण केले.
वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. फौंडेशनच्या सचिवा आस्मा नाईक यांनी अहवाल वाचन केले उपाध्यक्ष सुनील देसुरकर यांनी आभार मानले. सी. वाय. पाटील व शैलजा बी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
