
बेळगाव, दिनांक 8 (प्रतिनिधी) : कडोली येथे आज साहित्याचा जागर होणार आहे. त्या अनुषंगाने साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी कडोली गाव सज्ज झाले आहे.
सकाळी साडेनऊ वाजता हभप प्रवीण गणपती मायांना यांच्या हस्ते गावच्या वेशीत पालखी पूजन होऊन ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. ग्रंथ दिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत उपाध्यक्ष यलोजीराव पाटील यांच्या हस्ते 38व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.
यानंतर पॉली फ्लो व पॉलिहैड्रोन पुरस्कृत स्वामी विवेकानंद संमेलन नगरीचे उद्घाटन कुशल अनिल कुटे यांच्या हस्ते केले जाणार आहे. सांगाती पतसंस्थेचे चेअरमन प्रा. एच. के. गावडे यांच्या हस्ते सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन केले जाणार आहे. ग्रंथ दालनाचे उद्घाटन मोहन नारायण पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. सुनील मनोहर पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन, गीता वसंत सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन, नेत्रा मनोहर मेणसे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन, रुक्मिणी परशराम निलजकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन तर धनश्री रवी होनगेकर यांच्या हस्ते तर महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे
पहिल्या सत्रात परभणीचे प्रसिद्ध साहित्यिक नितीन सावंत यांचे अध्यक्ष भाषण होईल. दुसऱ्या सत्रात सांगलीचे प्रा. डॉ.दीपक स्वामी व महेश कराडकर तसेच मिरजेच्या नाना हलवाई यांचे कवी संमेलन होणार आहे. दुपारी कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर होणाऱ्या तिसऱ्या सत्रात अहमदनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय करमळकर यांचे ” माझा मराठीचा बोलू कवतिके ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर चौथ्या सत्रात शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांनी सहकाऱ्यांचा ” सह्याद्रीचा सिंह गर्जतो ” हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.
