
महाराष्ट्र-कर्नाटकात पुन्हा एकदा सीमावादावरून राजकारण तापले आहे. भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्याने ते महाराष्ट्राच्या की कर्नाटकच्या बाजूने आहेत, हेच समजत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
चंद्रकात पाटील यांनी सोशल मीडियावर बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’, असा केला आहे. महाराष्ट्रात बेळगावचा उल्लेख हा बेळगाव असाच केला जातो, किंबहुना तेथील मराठी माणूसदेखील तसाच उल्लेख करीत आहे. कर्नाटकी लोक बेळगावी असा उल्लेख करतात. त्यामुळे पाटील हे महाराष्ट्राच्या की कर्नाटकच्या बाजूने आहेत, तेच कळत नसल्याची टीका आव्हाड यांनी केली. पाटील हे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील पहिल्या पाचमधील एक मंत्री असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. दिल्लीत चांगले वजन असलेले नेते आहेत. ते आपल्या समाजमाध्यमांवर बेळगावचा उल्लेख बेळगावी करतात, हे दुर्दैव आहे.
