
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी दोन्ही राज्यातील नेत्यांच्या विधानावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री 3 डिसेंबरला बेळगावला भेट देत आहेत.याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची संयुक्त बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नी वेगवान घडामोडी घडण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. याचवेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावां संदर्भात केलेल्या विधानांवरून गदारोळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न उच्च अधिकार समितीची बैठक बोलावून व्यापक चर्चा केली आहे. याच बैठकीत नजीकच्या काळात महाराष्ट्राची उच्चाधिकार समिती सीमा प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भेट घेण्याचे हे निश्चित करण्यात आले आहे.
दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शंभुराजे देसाई तसेच तज्ञ समितीचे अध्यक्ष खास.धैर्यशील माने बेळगावला येऊन येथील मराठी भाषिकांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत बैठक घेणार आहेत.
याच वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये बैठक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
