
बेळगाव : मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० आणि मिराज २००० ही विमानं दुर्घटनाग्रस्त झाली. या दुर्घटनेत बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू झाला आहे. विंग कमांडर हणमंतराव सारथी हे संभाजी नगर, गणेशपूरचे रहिवासी आहेत. पार्थिव उद्या बेळगावमध्ये येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विंग कमांडर हणमंतराव सारथी यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे मोठे भाऊही हवाई दलात पायलट आहेत.
सुखोई-३० आणि मिराज २००० या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. त्यानंतर विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक गंभीर जखमी झाले असून एकाच शोध सुरु आहे.
दरम्यान दुर्घटनेची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी माहिती घेतली. याबाबत हवाई दलाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
