
कलबुर्गी – कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकां जाहीर झालेल्या नसल्या तरीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे नाव चर्चेत आले आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तरीही भाजपच्या (BJP) येडियुरप्पा प्रचारात सर्वात पुढे आहे. मात्र याच प्रचारादरम्यान येडियुरप्पा हे एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी येडियुरप्पा कलबुर्गी जिल्ह्यातील जेवेरगी भागात हेलिकॉप्टरने आले होते. मात्र हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे आजूबाजूच्या झोपड्यांवरचे प्लास्टिक आणि त्याभोवती असलेला कचऱ्याचा ढीग हवेत उडू लागला. त्यामुळे हवेतच हेलिकॉप्टर काही वेळासाठी खाली झुकले.
हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखून ते पुन्हा हवेत उडवले. पायलटने पुन्हा हेलिकॉप्टर वर नेले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलीस दलाने परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर उतरवता आले.
