
चंद्रपूरमध्ये मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाघाने एका महिलेचा बळी घेतला. गेल्या वर्षभरातील हा ५३ वा बळी ठरला आहे. सीताबाई दादाजी सलामे (६५, रा. तोरगाव) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शुक्रवारी इरव्हा टेकरी येथील नर्मदा प्रकाश भोयर (४५) हिला वाघाने ठार केले होते. तेथूनच २ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकरी व तोरगावच्यामध्ये आज सीताबाई दादाजी सलामे (६५, रा. तोरगाव) ही महिला शेतात काम करत असताना वाघाने झडप घालून त्यांना ठार केले. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्यादरम्यान घडली. ब्रम्हपुरी वनविभागाच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे गावकरी चांगलेच संतापले आहे. वाघांचा बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सततच्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
