
मुंबई : अभिनेते आणि निर्माते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. अनुपम खेर यांनी त्यांच्या दोघांचा फोटो ट्विटरवर शेअर करत ही निधनाची माहिती दिली आहे.
बॉलिवूडसाठी आणि कलाकारांसाठी आजची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन उजाडली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या.

‘मला माहिती आहे, ‘मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे!’ पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’ असं ट्विट करत अनुपम खेर यांनी मित्र सतीश कौशिकबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.
सतीश कौशिक यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे होते. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये झाला. ते उत्तम अभिनेत्यासह निर्माते आणि दिग्दर्शक आणि विनोदी कलाकारही होते.
सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. १९८३ मध्ये हा चित्रपट आला होता. त्यानंतर त्यांनी वो सात दिन, मासूम, मंडी, उडान, उत्सव, सागर, मोहब्बत, मि. इंडिया काश, उत्तर दक्षिण, ठिकाणा, जलवा, एक नया रिश्ता, राम लखन, वर्दी, जोशिले, प्रेम प्रतिग्या, आग से खेलेंगे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत यांनी भूमिका केल्या आहेत. अलिकडच्या काळात त्यांनी म्हणजे गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शर्माजी नमकीन, थार आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या छत्रीवाली आणि इमर्जन्सी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.
सतीश कौशिक यांनी दिग्दर्शिक केलेले अनेक चित्रपट गाजले. रूप की रानी चोरो का राजा, प्रेम, हम आपके दिल मे रहते है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बधाई, तेरे नाम, मिलेंगे मिलेंगे, गँग ऑफ घोस्ट, कागझ हे यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
सतीश कौशिक यांनी फक्त चित्रपटाच नव्हे तर वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. कथा सागर, दी ग्रेट इंडियन फिल्मी ड्रामा, सुमीत संभाल लेगा, मे आय कम इन मॅडम? स्कॅम १९९२, ब्लडी ब्रदर्स, गिल्टी माइंड्स, गन्स अँण्ड गुलाबमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.
