
बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी पुन्हा एकदा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. बेळगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस बजावली होती, त्या शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवारी आणखीन काही तक्रारी असल्यास तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून दाखल कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.
बेळगाव,कित्तूर ते धारवाड रेल्वे मार्ग करण्यासाठी नैऋत्य रेल्वे प्रयत्न सुरू केले आहेत. या मार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर शेतकऱ्यांनी मोर्चाकडून सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग न करता शेतकऱ्यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करावा अशी मागणी केली होती. स्वखर्चाने बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून आराखडा रेल्वे अधिकारी व प्रशासनाला सादर केला होता. तरीही शेतकऱ्यांचा विरोध डावलून सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे, बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हुबळी येथील के आय डी बी कार्यालयाला जाऊन मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले होते. ज्या शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बाजू मांडण्यासाठी उद्या शुक्रवारी तहसील कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
