
खानापूर, ता. २९ : मराठी भाषा आणि संस्कृती वर हल्ले होत असताना मुकाट्याने सहन करणे आमच्या रक्तात नाही. अमिशे आणि भुलथापाना बळी न पडता माय मराठीच्या रक्षणासाठी कार्यरत रहा असे आवाहन निवृत्त मुख्याध्यापक मधूकर देसाई यांनी केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या युवक आणि युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शनीवारी हलशी, हलशीवाडी, गुंडपीत समितीची सभा प्रचार रॅली झाली.
खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघ विस्ताराने मोठा आहे. तसेच तालुक्यात गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांना प्रत्येक गावापर्यंत जाऊन पोहोचणे शक्य होत नाही. मात्र समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून काही युवक व युवती रात्रंदिवस समितीचा प्रचार करू लागले आहेत. भाषणावर असलेली पकड आणि चांगल्या वक्तृत्व शैलीमुळे या युवक युवतींच्या भाषणाला मोठी गर्दी होऊ लागली आहे. समितीने हे वातावरण नक्कीच यशाचे शिखर सर करील असा विश्वास आबासाहेब दळवी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील आणि समितीचे पदाधिकारी गावामध्ये पोहोचण्या अगोदर वातावरण निर्मिती करण्यामध्ये या युवक युवतींचा मोठा हातभार लागत लागत असून युवा वर्ग यशस्वी होऊ लागला आहे. खानापूर, नंडगड, बेकवाड, हलशी, जांबोटी, कणकुंबी, हलगा, मेरडा, माचीगड, रूमेवाडी, गर्लगूंजी यासह तालुक्यातील अनेक गावे युवा वर्गाने पिंजून काढली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा युवावर्ग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी एकवटत असल्याचे मत समितीचे युवानेते निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. यावेळी नारायण देसाई निंगाप्पा देसाई वामन देसाई, तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई, रणजित पाटील, विट्ठल गुरव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
