
बेळगाव – बेळगाव महापौर निवडणुकीतील कायदेशीर अडचण दूर झाली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. एडवोकेट जनरल यांचे मत विचारात घेऊन सरकार व निवडणूक आयोग बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूकचा कार्यक्रम येत्या तीन ते चार दिवसात जाहीर करेल.अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे.
बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूक होत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजप नगरसेवकांची बैठक महावीर भवन येथे घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर निवडणूक होईल.बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकेल अशी माहिती दिली. यावेळी आमदार अनिल बेनके व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन पंधरा महिन्यांचा काळ लोटला आहे. महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र तरीही महापौर निवडणूक झालेली नाही. 15 ऑगस्ट च्या आधी निवडणूक होईल असे आमदार पाटील यांनी जुलैमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर आमदार पाटील यांनीच ऑक्टोबरच्या पहिला आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी सहा किंवा नऊ जानेवारीला निवडणूक होईल असे जाहीर केले आहे.
