
बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील वाद तापल्यामुळे,बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला जाणार आहे. सुमारे 4000 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.
बेळगावात 19 ते 29 डिसेंबर या कालावधीत विधिमंडळ हिवाळी अधिवेशन चालणार आहे.त्यानिमित्त व्यापक पोलिसांचा बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र कर्नाटकातील सीमा प्रश्नासंदर्भातील वाद चिघळला आहे. यामुळे बेळगाव सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. संवेदनशील स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सुवर्णसौध, सुवर्णसौध परिसर,शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकां मध्ये पोलिसांची कुमक वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिवेशनानिमित्त पोलिसांकडून तात्पुरते आऊट पोस्टची निर्मिती सुवर्णसौध परिसरात राहणार आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात 19 डिसेंबरला होईल आणि 29 डिसेंबरला त्याची सांगता होईल. मात्र अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर आणि सुप वाजल्यानंतर एक दिवस बंदोबस असणार आहे.अधिवेशन काळात 8 जिल्हा पोलीस प्रमुख, 38 अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख,80 पोलीस निरीक्षक तसेच 4 हजार सहाय्यक व पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
