
कणबर्गी (ता. जि. बेळगाव) गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाच्या पुरातन मंदिराचा भाविकांनी उदारहस्ते दिलेल्या देणग्यांमधून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिराचे उद्घाटन, वास्तुशांती आणि कळसारोहण समारंभ असा संयुक्त सोहळा येत्या रविवार दि. 12 ते मंगळवार दि. 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
सदर सोहळ्याच्या पहिल्या दिवशी येत्या रविवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता गावातील श्री महालक्ष्मी मंदिरापासून भक्तांकरवी श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत कळसाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंदिरामध्ये गणहोम आणि त्यानंतर सायंकाळी आणखी एक महत्त्वाचा होम होईल. शेवटच्या दिवशी मंगळवारी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मंदिराच्या जिर्णोद्धार केलेल्या वास्तूची वास्तुशांती, कळसारोहण आणि उपस्थित मान्यवर अतिथींचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. सत्कारानंतर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तरी समस्त भक्तांनी बहुसंख्येने उपरोक्त सर्व कार्यक्रमांना हजेरी लावून शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान जिर्णोद्धार मंडळ कणबर्गी, कणबर्गी गावातील सर्व युवक मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ आणि कणबर्गी गावकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे
