
खानापूर तालुक्यातील चिखले-आमगाव हा साडेसहा कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. चिखले गावच्या रस्त्याचे आधीच डांबरीकरण झाले आहे. परंतु चिखले गाव ते आमगाव गावाला जोडणारा रस्ता 25 वर्षांपूर्वी शासनाने मंजूर करूनही केवळ मेटलिंग करण्यात आले आहे. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही पुढे आले नाही.
आता रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यात संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे लोकांना कामासाठी इतर गावात जाता येत नाही. शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नाही. आजारी रुग्ण व गरोदर महिलांना दवाखान्यात नेता येत नाही. गावात रुग्णवाहिकाही येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दुचाकी आणि खासगी वाहनांची ये-जा करणेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे हा आमगाव रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले.याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या,

आमगाव रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यावरूनच लोकांना ये-जा करावी लागत आहे. येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ जागे होऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी अर्जुन गावडे यांच्यासह आमगाव गावातील महिला वर्ग उपस्थित होता,
