
बेळगाव-पंढरपूर मार्गावर मागील अडीच वर्षांपासून रेल्वे बंद आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता कोरोना आटोक्यात आला असून या मार्गावर पुन्हा रेल्वे सुरू करावी, अशी मागणी बेळगाव वारकरी महासंघाच्यावतीने खासदार मंगला अंगडी यांच्याकडे करण्यात आली.
बेळगाव, खानापूर, चंदगड या परिसरात हजारो वारकरी आहेत. हे वारकरी प्रत्येक एकादशीला विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. कोरोनापूर्वी बेळगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी तीन रेल्वे उपलब्ध होत्या. परंतु मागील अडीच वर्षांपासून या रेल्वे रद्द असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. बसचा प्रवास आर्थिकदृष्ट्या महाग असून वयस्करांसाठी तापदायक ठरत आहे. त्यामुळे बेळगाव-पंढरपूर मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी अंगडी यांच्याकडे करण्यात आली.
बेळगाव-पंढरपूर या रेल्वेचे तिकीट केवळ 110 रुपये असल्याने वारकऱ्यांना ये-जा करणे पूर्वी सोयीचे ठरत होते. सध्या यशवंतपूर-पंढरपूर ही साप्ताहिक रेल्वे शुक्रवारी बेळगावमधून धावते. परंतु ती देखील आठवड्यातून एकदाच असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. बसचे तिकीट 450 ते 500 रुपये होत असल्याने वारकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कमी दरात प्रवासासाठी रेल्वेची मागणी जोर धरत आहे.
मंगला अंगडी यांनी निवेदन स्वीकारून आपण नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. 1 फेब्रुवारी रोजी माघवारी असल्याने त्यापूर्वी रेल्वे सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली. यावेळी अध्यक्ष भानुदास पवार, सेक्रेटरी अॅड. श्रीकांत पवार, अँड. सुभाष मुतगेकर, विलास पोटे, ज्ञानेश्वर काकडे यासह वारकरी उपस्थित होते.
