
गोंदिया न्यूज : कोसमरा जंगलाच्या टेकडीजवळ पोहोचताच पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने विमान अचानक टेकडीवर जाऊन आदळले. ही दुर्घटना आज दुपारी ३ वाजता घडली.
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या विमानाला अपघात झाला असून या दुर्घटनेत एक महिला व एका पुरुष वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील लांजीपासून १२ किमी अंतरावर किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोसमरा जंगलाच्या टेकडीवर वैमानिकांचे मृतदेह आढळून आले. ही घटना काल शनिवारी दुपारी ३ वाजता घडली असून महिला पायलटचे नाव रुपशांका आणि पुरुष पायलटचे नाव मोहित असल्याचे समजते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोंदिया मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर बिरसी येथे इंदिरा गांधी उडान आकॅडमी असून यात भारताच्या काना-कोपऱ्यातून युवक-युवती विमान प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान एक प्रशिक्षक आणि विद्यार्थी अशा दोघांनी प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले. मात्र विमान मध्य प्रदेशतील लांजीपासून 12 किमी अंतरावर किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोसमरा जंगलापर्यंत पोहोचले आणि प्रशिक्षण केंद्राचा विमानाशी संपर्क तुटला. त्यानंतर अधिक माहिती घेतल्यावर कळाले की कोसमरा जंगलाच्या टेकडीजवळ पोहोचताच वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान अचानक टेकडीवर जाऊन आदळले.
