
तेलंगणामध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. तेलंगणा पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना फितवून पक्षांतर करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तिघांवर आहे.तेलंगणा राष्ट्र समितीने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.पोलिसांनी सांगितलं की, तीन लोक अच्चमपेटचे आमदार गुव्वला बालराजू, कोलपूरचे आमदार बीरम हर्षवर्धन रेड्डी, पिनपकाचे आमदार रेगाकांता राव आणि तांदूरचे आमदार पायलट रोहीत रेड्डी यांना लाच देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पक्षांतरासाठी हे प्रलोभन दाखवलं जात होतं.
सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी सांगितलं की, तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हैदराबादमधील एका फार्म हाऊसवर छापे घालून शोध घेतला गेला.
