
ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक केली.
शेतकऱ्यांचे ऊस दरासाठी तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी साखर कारखानदारांनी एकजूट केली असून त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना लोटला तरी शेतकऱ्यांसह रयत संघटनेच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
साखरमंत्र्यांनी कारखानदारांना दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असे आदेश देऊनही कारखानदाराने याकडे दुर्लक्ष करत गळीत हंगाम सुरूच ठेवला आहे. तसेच राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेले कारखानदार ऊस दर प्रश्नी मौन पाळले आहेत, असा आरोप करत रयत संघटनेतर्फे आंदोलन छेडले आहे
महिनाभर आंदोलन करूनही मुख्यमंत्री तसेच साखरमंत्र्यांनी अद्याप याबाबत योग्य तोडगा काढला नसल्याने संतापलेले संघटनेचे पदाधिकारी बेळगावात गणेशपुर रोडवरील साखर आयुक्तालयात गेले. यावेळी साखर आयुक्त नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तालयास टाळे ठोकले.
