
‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोल्याळी गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत खेळाचे साहित्य भेट स्वरूपात दिले.
यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा संपल्या आहेत. तेव्हां या छोट्या मुलां-मुलींना मैदानात खेळायची संधी मिळाली म्हणून ‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गरजू विद्यार्थ्यांना खेळायचे साहित्य वितरण करण्यात आले. याकरिता राजस्थानी युवा मंच, संजय पुरोहित, जयवंत साळुंखे यांनी मोलाची मदत केली. हे साहित्य वितरीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देसाई, राजू तारीहाळकर, संज्ञा सांबरेकर, आरती चौगुले, केशव सांबरेकर यांनी हातभार लावला. हे खेळाचे साहित्य मिळताच सदर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला व ती खेळण्यात गुंग झाली. आपल्या छोट्या मित्रांच्या चेहऱ्यावर हास्य पसरविण्यासाठी ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून आपणास जमेल तशी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत मदत करू असे आश्वासन यावेळी राहुल पाटील यांनी दिले.
