इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) गहू महाग झालाय. गाडीतून आलेल्या पोत्यांमधून किलोभर गहू घेण्याच्या धडपडीत लोकांचा मृत्यू होतोय. नैसर्गिक संकट आणि सरकारी उदासिनतेनं पाकिस्तानात गव्हाचं संकट दिवसेंदिवस भीषण बनत चाललंय. पाकिस्तानच्या बलुचिस्तानातली दृश्यं समोर आली आहेत. सरकारनं सबसिडी दिलेला गव्हाचा एक ट्रक गावात पोहोचला. मात्र झुंबड उडणार यासाठी आधीपासून एके-47 घेतलेले जवान त्यावर तैनात होते. संबंधित व्हिडीओत रेशन दुकानात गहु जाण्याआधीच लोकांना गव्हाच्या ट्रकला घेराव घातला. त्यामुळे जमलेल्या लोकांना धक्का देऊन दूर करण्यात आलं. या गावात तर संतापलेल्या लोकांना ट्रकवरच ताबा घेतला. ज्यांच्या हाती जितके गहु लागले तितके त्यांनी घरी नेले.
गव्हाच्या एका पिशवीसाठी त्यानंतर मारामारी झाल्याची माहिती समोर आलीय. एकमेकांच्या हातून गव्हाच्या पोती हिसकावल्या गेल्या. हातात पैसे घेऊन एक व्यक्ती ट्रकच्या मागे धावत राहिला. फक्त एक किलो गहू मिळावा यासाठी पाकिस्तानच्या अनेक भागात लोक गव्हाच्या गाड्यांवर तुटून पडतायत.
काही ठिकाणी तर गहू घेण्यासाठी ज्या थाळ्या लोकांनी आणल्या होत्या, त्याच थाळ्यांनी एकमेकांची डोकी फोडण्यात आली.
वेळ पडली तर अंगावरच कपडे विकेन, पण गव्हाचे दर वाढू देणार नसल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफांनी म्हटलं होतं. मात्र आजच्या तारखेपर्यंत पाकिस्तान सरकार गव्हाचे दर कमी करण्यात अपयशी ठरलंय.
गव्हाच्या पीठाच्या 1 किलो पिशवीचे दर अव्वाच्या सव्वा
कराचीत गव्हाच्या पीठाच्या 1 किलो पिशवीची किंमत 140 ते 160 रुपये इतकी आहे. इस्लामाबादेत 10 किलो 1500 तर 20 किलोची पिशवी 2800 रुपयांना मिळतेय. तर पंजाब प्रांतात 160 रुपये किलोनं गव्हाच्या पिठाची 1 किलोची पिशवी विकली जातेय.
विरोधाभास म्हणजे पाकिस्तानाहून अफगाणिस्तान मागास मानला जातो. मात्र काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर तिथं पहिली सुपरकार लाँच झाली. एकीकडे सुपरकार आणि दुसरीकडे गव्हाची मारामार. या तुलनेचाही व्हिडीओ अनेकांनी शेअर केला.
महिला मंत्र्याच्या व्हिडीओवर संतापाची लाट
आठवड्याभरापूर्वी बलुचिस्तानच्या अन्न पुरवठा मंत्र्यांनी फक्त बलुचिस्तानलाच तातडीनं 4 लाख पोती गव्हाची गरज असल्याचं म्हटलं होतं.
पाकिस्तानच्या सरकारनं रशियाकडून साडेसात लाख टन गहू खरेदी केलाय. त्यापैकी साडेतीन लाख टन गहू पाकिस्तानला देण्यात आलाय. मात्र भाव नियंत्रित ठेवणं अजूनही सरकारच्या हाताबाहेर आहे.
एकीकडे देशात गव्हासाठी आणीबाणीसदृश स्थिती आहे. आणि दुसरीकडे पाकिस्तान सरकारची एक महिला मंत्री चैनीत आयुष्य जगतेय. शेरी रेहमान नावाची ही महिला पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहे. जवळच्या व्यक्तींसोबत विमानात जल्लोषाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं.
सिंध आणि पाकिस्तानातील पंजाब या दोन्ही प्रांतात गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. गव्हाचं कोठार म्हणून पाकिस्तानची ही दोन्ही राज्य प्रसिद्ध आहेत. याआधीपर्यंत हे दोनच प्रांत पाकिस्तानच्या गव्हाची भूक भागवून निर्यात सुद्धा करत होते.
मात्र गेल्यावर्षी पाकिस्तानात आलेला पूर, उष्णतेची लाट, हमीभावाच्या घोषणेत झालेल्या दिरंगाईमुळे घटलेली लागवड, तेलाचे वाढलेले भाव आणि युक्रेन-रशियाच्या युद्धाच्या परिणाम, पाकिस्तानसाठी गव्हाचं संकट घेऊन आला.
मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये पाकिस्तान सरकारला सिंध आणि पंजाब भागातून 2.70 लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज होता.
मात्र अंदाजाहून तब्बल 15 टक्के उत्पादन घटलं. प्रत्यक्षात लागवड कमी झाली. आणि ज्या भागात लागवड झाली तिथं
महापुरानं नुकसान केलं. याच काळात पाकिस्तानातली राजकीय स्थिती अस्थीर होती. त्यामुळे गव्हाच्या मागणी-पुरवठ्याचं
गणित पाकिस्तान सरकारच्या लक्षातच आलं नाही.
पाकिस्तानात अत्यावश्यक वस्तूंचा भाव गगनाला भिडला….
फक्त गहूच नाही तर पाकिस्तानात इतर सर्व अत्यावश्यक गोष्टी गगनाला भिडल्या आहेत. दुधाचा भाव 149 रुपये प्रती लीटर आहे कांदा 220 रुपये किलो मीठ 49 रुपये किलोवर गेलंय आणि चिकनचा भाव 650 रुपये किलो झालाय
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा भारताच्या पंतप्रधानांना संदेश
दहशतवाताला खतपाणी आणि युद्धाच्या खुमखुमीतून फक्त गरिबीचं पीक येतं. हे इतक्या वर्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या लक्षात आलंय. महागाईच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ म्हटले की, “भारतासोबत तीन युद्धं करुन फक्त गरिबी मिळालीय. आम्हाला गरिबी संपवून समृद्धी आणि प्रगती हवी आहे. लोकांना शिक्षण द्यायचंय. आरोग्य-रोजगारावर काम करायचंय. आता फार काळ आमची संसाधने बॉम्ब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाच संदेश द्यायचा आहे.”
कट्टरता आणि दहशतवादाच्या आगीचा फैलाव सोपा असतो. मात्र जेव्हा भुकेच्या आगीचा वणवा भडकतो तेव्हा त्या आगीची धग सरकार भस्म करु शकते. हे पाकिस्तानच्या सरकारला उशिरानं का होईना ध्यानात आलंय.