महाराष्ट्र पुत्राला वीरमरण, कुपवाड्यात गस्तीवर होते, अचानक बर्फाचा मोठा तुकडा आला… 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू!
लष्करातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये अलमोरा पोस्ट परिसरात हे तीन जवान गस्त घालत होते.
राजगोळकर, श्रीनगरः जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे काल झालेल्या हिमस्खलनात तीन जावानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तिघांमध्ये एका महाराष्ट्र पुत्राचा समावेश असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या तिघांमध्ये धुळ्यातील मनोज गायकवाड यांना वीरमरण प्राप्त झाल्याचं उघड झालं आहे. काश्मीरमधील माछिल कुपवाडा येथे काल मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झालं. हे जवान शुक्रवारी संध्याकाळी गस्त घालत असताना अचानक हिमस्खलन झाले. यावेळी बर्फाचा मोठा तुकडा लष्कराच्या जवानांवर पडला .
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेत बर्फाच्या तुकड्याखाली पाच जण दबले होते. यापैकी दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र अन्य तिघांचा मृत्यू झाला.
स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळेपर्यंत बर्फाच्या तुकड्याखाली दबल्याने या तिघांचा मृत्यू झाला होता. वीरगती प्राप्त झालेल्या तिघांची नावं गनर सौविक हाजरा (22), लांस नायक मुकेश कुमार (22) आणि नायक मनोज लक्ष्मण गायकवाड (41) अशी आहेत.
मनोज यांच वय 41 वर्षे होत, 2002 साली त्यांनी भारतीय सैन्य दल जॉईन केलं होतं. लष्कराच्या 56 राष्ट्रीय रायफल बॅचचे हे जवान होते.
मागील दोन वर्षांमध्ये माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनाची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी 14 जानेवारी 2020 मध्ये अशाच एका दुर्दैवी घटनेत चार जवानांना वीरमरण प्राप्त झालं होतं,
लष्करातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये अलमोरा पोस्ट परिसरात हे तीन जवान गस्त घालत होते. यावेळी अचानक हिमस्खलन झाले. ही माहिती मिळताच सुरक्ष दलाची टीम घटनास्थळी पोहोचली. वेगाने बचावकार्य सुरु झाले. पण बाहेर काढण्यापूर्वीच तीनही जवानांचा मृत्यू झाला होता,