
फार्मा कंपनीत स्फोट, आतापर्यंत 17 कर्मचारी जिवंत जळाले.
आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मा कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजय कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला होता.
अच्युथापुरम स्पेशल इकॉनॉमिक झोन मधील फार्मास्युटिकल कंपनी एशिंटियामध्ये लंच ब्रेक दरम्यान हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लंच ब्रेक दरम्यान कंपनीच्या आवारात झालेल्या स्फोटानंतर मोठी आग लागली. कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगारांची सुटका केली. जखमींना अनकापल्ले येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
स्फोटाच्या वेळी कंपनीत सुमारे 300 कर्मचारी उपस्थित होते. स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. स्फोटामुळे आजूबाजूच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर कंपनीबाहेर जमलेल्या कर्मचाऱ्यांनी पीडितांना नुकसान भरपाई आणि निष्काळजीपणाबद्दल अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या स्फोटावर शोक व्यक्त केला आहे. अनकापल्लेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
