
ऊस पिकाला उत्तम पर्याय वायंगणी भात पीक – हलशीवाडीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग.
हलशी : (प्रतीनीधी-उमेश देसाई) उष्म हवेने अलगद निसटलेली पिवळी पाने, पुन्हा फुटलेले अंकुर, विविध अंगी रंगानी भरलेली आमराई, रानमेवा, आंबे आदी गोड रसाळ फळे घेऊन आलेला, हा चैत्र महिना. मात्र, या महिन्यात हिरव्यागार वनराई सोबत शेतीने ही हिरवी शाल पांघरली तर नवलच..! मन प्रसन्न करणारे हिरवे स्वप्न, हलशीवाडी येथील प्रगतशील शेतकरी अनंत देसाई यांनी फुलवून, शिवारात जणू गुढीच उभारली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा हा प्रयोग राबविल्यास ऊसाला पर्याय होऊन उत्पादन वाढीस लागणार आहे.
खानापूर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. हा तालुका म्हणजे भात पिकाची खाण म्हणूनच परिचित आहे. मात्र गेल्या काही वर्षात भात पिकाला, उत्तम दर मिळत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. परंतु ऊस पिकाचा वाढता खर्च, जंगली जनावरांचा त्रास, तोडणी मजुरांची वाढती मजुरी, कारखान्याकडून दिला जाणारा मोबदला, पाहिल्यास शेतकरी कंगाल बनू लागला आहे. दोन वर्षात भाताला उत्तम दर मिळू लागला असून, याचाच विचार करत हलशीवाडी येथील शेतकरी अनंत देसाई यांनी एकरभर जमिनीतील ऊस पिक काढून, त्यामध्ये उन्हाळी भात पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी संकरित जातीचे भात पेरणी करून रोप तयार केली. भर उन्हात शिवारात पाणी सोडून वायंगणी वाफे तयार केले व त्यामध्ये भात रोपणी व्यवस्थित रित्या केली. पाण्याचा पुरवठा योग्य पद्धतीने केल्याने, आता भात तरारून आले आहे. अडीच महिन्याच्या लागवडीनंतर पीक पोटरीला येऊन उत्तम प्रकारे पोसवन झाली आहे. पावसाळ्यापेक्षाही उत्तम पीक उन्हाळ्यात बहरून आल्याने, त्यांची ही शेती पाहण्यास गर्दी होऊ लागली आहे.
या एकरभर भात लागवडीत किमान 80 पोती भात मिळण्याची शक्यता जाणकारातून व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत वर्षभर राबून उसातून जितके उत्पन्न मिळते. त्याच्या दुप्पट उत्पन्न या पिकातून शेतकरी घेऊ शकेल असा अंदाज आहे. खानापूर तालुका भात पिकाला पोषक असल्याने, शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या नादी लागण्याऐवजी दोन भात पिके घेतल्यास उत्पादनात वाढ होईल असे देसाई यांचे मत आहे. शिवाय पावसाळ्यात भात पीक घेताना जितका त्रास सहन करावा लागतो, तितके परिश्रम या उन्हाळी पिकाला लागत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे. पाण्याचा योग्य पुरवठा औषध व खत फवारणी वेळेत केल्यास शेतकरी उत्पन्नात अग्रेसर होतील असेही ते म्हणतात. शिवाय भात पिकाला लागूनच त्यांनी घेवडी व कारले पीक लागवड ही केले आहे. याचीही लागवड आज उत्तम प्रकारे बहरून आली आहे. ऊस मिरची आदी पिकाला जास्त खर्च करून कमी उत्पन्न मिळविण्याऐवजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जात बुडून न जाता दुबार भात पिक घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे . विविध अंगी प्रयोग करीत, भात पिकाबरोबर भाजी उत्पादनासही शेतकऱ्यांनी अधिक महत्त्व द्यावे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
