
बेळगाव – बेळगावच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीची नोटीस महापालिकेकडून 58 नगरसेवक तसेच सात पदसिद्ध सदस्यांना पाठविण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला घेण्याचे प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ यांनी जाहीर केले आहे.
ओबीसी आरक्षणाची समस्या कायम असताना प्रादेशिक आयुक्त एम. जी.हिरेमठ यांनी 31 जानेवारीच्या आत निवडणूक घेण्याचे आश्वासन दिले होते.महापौर उपमहापौर निवडणुकी संदर्भात शहराचे आमदार अभय पाटील आणि अनिल बेनके यांनी प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ यांची भेट घेऊन निवडणुकीची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या कामाला वेग आला.
तब्बल 15 महिन्यांनी नगरसेवकांना महापौर निवडणुकीची नोटीस मिळाली आहे. 6 फेब्रुवारीला नूतन नगरसेवकांचा शपथविधी होईल.त्यानंतर नगरसेवकांना त्यांचे अधिकार प्राप्त होतील. शिवाय महापौर निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकारही मिळेल. महापालिका निवडणूक झाल्यानंतर 16 महिन्यांनी नगरसेवकांना अधिकार प्राप्त होणार आहेत. बेळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे या पक्षाचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे.
