चंदगड : काजू उत्पादक तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काजू बोर्ड होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न होणे आवश्यक असून शिवाजीराव पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन भरमु अण्णा पाटील यांनी केले. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कैश्यू प्रोसेसर्स अँण्ड ट्रेडर्स असोशिअसनच्या वतीने आयोजित सहाव्या ‘कैश्यू टेक एकस्पो’चे उद्घाटन मा.राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, भाजप नेते शिवाजीराव पाटील तसेच काँग्रेस नेते गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजन मोहन परब यांनी केले. तर स्वागत प्रा. दीपक पाटील यांनी केले.
यावेळी मोहन परब म्हणाले की, चंदगड तालुक्यात साधारणपणे सहा ते सात लाख टन काजू उत्पादन होते. मात्र, त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होवून त्यांचा उद्योगासाठी म्हणावा तसा उपयोग होत नाही. आज शासनाकडून 1175 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून या क्षेत्रात विकास व्हावा. या उघोगाला १०० वर्षाचा इतिहास असून महाराष्ट्रातूनच पहिल्यादा काजू निर्यात व्हायची, आज ती परिस्थिती नाही. देशातून काजू निर्यात 43 % वरून केवळ 3 % वर आली आहे. त्यामूळे निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर काजू फळावर प्रक्रिया होवून त्यापासून इथेनॉल निर्मिती होणे आवश्यक आहे.
भरमू अण्णा पाटील म्हणाले, सुरुवातीला बंडिंग योजना लागू झाली आणि त्या माध्यमातून जमिनीची धूप थांबावी म्हणून काजू लागवडीला त्याकाळी प्रोत्साहन देण्यात आले. त्यातूनच चंदगड विभागात काजू उत्पादन वाढीला वाव मिळाला. त्यानंतर काजू कारखानदारीला सुरुवात झाली. आज तालुक्यात दोनशेच्या वर काजू कारखाने आहेत. मात्र, काजू बोर्ड नसल्याने शासनाच्या वतीने कोणताही निर्णय घेता येत नाही. मुख्यतः काजूची प्रतवारी निर्माण करण्याची गरज आहे. त्यातूनच चंदगड तालुक्यातील काजूला महत्त्व मिळू शकते. खऱ्या अर्थाने काजू व्यवसायाने महिलांना रोजगार निर्माण करून दिला. मात्र, या काजू व्यवसायाला वाढीसाठी निर्णायक अशा काजू बोर्डाची अत्यंत गरज असून ते शासन स्थरावर शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने पूर्ण व्हावे अशी अपेक्षा भरमुअण्णा पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवाजीराव पाटील यांनी आपण शक्य तितकी मदत शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच काजू उत्पादक आणि उद्योजकांना सबसिडी तसेच जास्तीत जास्त सहकार्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा काजू प्रोसेसर आणि ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व संचालक, काजू कारखानदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.