सीमाप्रश्न केवळसीमावासीयांचाच नव्हे तर माझा, माझ्या कुटुंबाचा आहे, अशी ठोस ग्वाही अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके (राष्ट्रवादी) यांनी दिली.
या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागावा असे मला मनापासून वाटते. याकरिता जे जे काही करता येईल ते ते मी करेन असे निलेश लंके म्हणाले.
आमदार निलेश लंके हे आज शनिवारी बेळगावला आले होते. यावेळी तुकाराम बँकेचे सभागृहात त्यांचा पुष्पगुच्छ आणि सीमा प्रश्नसंदर्भातील माहिती पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सीमाप्रश्न आणि सीमा प्रश्नाच्या सोडवणुकी संदर्भात चाललेल्या चळवळीची आमदार निलेश लंके यांना माहिती दिली. तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी विनंती वजा मागणी केली.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आपण आवाज उठवूच शिवाय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी, 23 नोव्हेंबरला सीमाप्रश्नाची तारीख आहे. त्यासाठी पोषक अशा हालचाली व्हाव्यात, तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालानुसार सीमाभागात मराठी भाषेतून परिपत्रके दिली जावीत, याकरिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा असे सांगितले.
यावर बोलताना निलेश लंके यांनी, सीमाभागातील खासदार या संदर्भात आपल्याला मदत करतील ही अपेक्षाच न करणे बरे असे म्हटले.
आपण माननीय शरद पवारसाहेब यांच्या सल्ल्यानुसार थेट राष्ट्रपतींची भेट घेऊ भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मागणी करू अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली.
याप्रसंगी विकास कलघटगी यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते