
कोलंबिया : कोलंबियातील जंगलात एक खासगी विमान कोसळले होते. या अपघातात दोन आठवड्यांहून अधिक काळ बेपत्ता असलेली चार मुले बुधवार दि. 17 मे रोजी जिवंत सापडली.
13, 9, 4 आणि 11 वर्षे वयाची ही मुले काक्वेटा प्रांतातील घनदाट जंगलात सुखरूप आढळून आली. ‘सेस्ना 206’ हे विमान अराराकुआरा आणि सॅन जोस डेल ग्वाविअरे दरम्यानच्या मार्गावरून सात जणांना घेऊन जात होते. 1 मे रोजी हे विमान बेपत्ता झाले होते. कोलंबियाच्या लष्कराने सांगितले की, विमानातील दोन पायलट आणि मुलांची आई 16 मे रोजी मृतावस्थेत आढळून आली. फुटेज आणि कोलंबियन मिलिटरी फोर्सेसने जारी केलेल्या प्रतिमांमध्ये खाली पडलेले विमान, कुत्र्यांसह मुलांचा शोध घेत असलेले सैनिक, तसेच बाटली आणि फळांच्या साली यांसारख्या मुलांनी मागे सोडलेल्या खुणा दिसून येत होत्या.
लष्कराने सांगितले की, मुलांनी बनविलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यामुळे तसेच त्यांनी वापरून फेकलेल्या वस्तूंमुळे त्यांना शोधता आले. मुलांची तब्येत चांगली असल्याचे दिसून आले आणि त्यांना सॅन जोस डेल ग्वाविअर येथील रुग्णालयात नेण्यात आले. लवकरच त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल.
