
बेळगाव, दिनांक 4 (प्रतिनिधी) : सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपल्यापरीने कार्यरत असणाऱ्या वेदांत फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदा तीन शिक्षक, तीन पत्रकार आणि तीन पोलीस अशा नवरत्नांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ” वेदांत एक्सलन्स अवॉर्ड ” देऊन सन्मानित केले जाणार आहे.
शनिवार, दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कणबर्गी येथील महेश फाउंडेशनच्या सभागृहात हा गौरव सोहळा आयोजिण्यात आला आहे. रोटरी क्लब बेळगाव साउथ चे अशोक नाईक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
उद्घाटक म्हणून बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि केआरआयडीएल, बेंगळूरचे व्यवस्थापकीय संचालक एम. जी. हिरेमठ आणि बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, समृद्धी सेवा संस्थेचे सचिव वीरेश किवड्सन्नवर, यासह काकडे फाउंडेशन बेळगावचे चेअरमन किशोर काकडे, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि माजी प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, महेश फाउंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
सुदृढ समाज उभारणीसाठी सशक्त मनाच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांची फळी गरजेची आहे आणि असे विद्यार्थी चांगले गुरुच घडवू शकतात. याशिवाय सदृढ आणि सशक्त समाज उभारणीत पोलीस आणि पत्रकारांचे कार्य खूपच मोलाचे ठरते. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून वेदांत फाउंडेशनच्यावतीने ” वेदांत एक्सलन्स अवार्ड ” देऊन शिक्षक, पोलीस आणि पत्रकारांच्या गौरव सोहळ्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष सुनील देसुरकर आणि सचिवा आस्मा नाईक यांनी दिली आहे.
