बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे कर्करोगावरील उपचारासाठी दाखल झालेल्या एका विणकर कामगाराने आपण उपचार घेत असलेल्या वॉर्डच्या आवारात ओडणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. परशराम यल्लाप्पा सोनटक्की (वय 50, रा. देवांगनगर, वडगाव) असे त्या दुर्दैवी विणकर कामगाराचे नाव आहे. मध्यरात्रीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून बुधवारी एपीएमसी पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मेडिकल वॉर्डसमोरील अँगलला ओडणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विणकर व्यवसायासाठी परशरामने कर्ज उचलले होते. क्यवसाय व्यवस्थित चालला नाही. त्यामुळे कर्जाचे ओझे वाढत गेले. यातच तो कर्करोगाने त्रस्त झाला.
1 फेब्रुवारी रोजी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. औषधोपचार सुरू असतानाच जीवनाला कंटाळून परशरामने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत. विणकरांच्या वाढत्या आत्महत्या प्रकरणांमुळे समाजाची चिंता वाढली आहे. कोरोनानंतर अनेक विणकर कामगारांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून कर्जाला कंटाळून एकापाठोपाठ एक जण आत्महत्या करीत आहेत. विणकरांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे