मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटल आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना परखड शब्दात सुनावले आहे. जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश सोडण्यास तयार असतील तर कर्नाटकला काय देता येईल याबाबत विचार होऊ शकतो, असे शरद पवार म्हणाले.
आज शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सीमाप्रश्नाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहेत, तशी विधानं त्यांनी केली आहेत. अशी मागणी आम्हीही अनेक वर्षांपासून करत आहोत. आम्ही बेळगाव मागतो, आम्ही कारवार मागतो. आम्ही निपाणी मागतो. तिथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. या भागाबाबत आपण सातत्याने मागणी करत आहोत. आता त्यांनीही काही गावांची मागणी केली आहे. मी त्या गावांबाबत सांगणार नाही. मात्र बेळगाव, कारवार, निपाणीसह हा सर्व परिसर ते जर सोडणार असतील तर त्यांना काय द्यायचं याची चर्चा होऊ शकते, असा टोला शरद पवार यांनी लगावला.