बेळगांव : शहरातील रामनगर (शिव-बसव नगर) प्रभागातील एकाच परिसरात असलेल्या 4 सरकारी प्राथमिक (2-मराठी, 1-कन्नड व 1-उर्दु) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले.
या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब व कष्टकरी कामगारांच्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्याचे कोणतेही साहित्य दिसत नाही किंवा इतरत्र खेळण्यासाठी नीटसे खेळाचे साहित्य कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नाहीत.
परिणामी या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी मैदानी खेळापासून वंचित राहू नयेत व त्यांची नैसर्गिक वाढ इतर शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच व्हावी म्हणून ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देऊन त्यांची छोटीशी मदत करण्याची ठरवली आहे. या कार्यक्रमात बेळगांव शहराचे डीसीपी रविंद्र गडादी (कायदा व सुव्यवस्था), डाॅक्टर सुरेखा पोटे (स्त्रीरोग तज्ञ), प्रशांत बिर्जे (मुख्याध्यापक कॅंटोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा), कौस्तुभ पोटे (व्यावसायीक) व प्रसाद हुली (सेक्रेटरी बेळगावी ट्रेडर्स) यांच्या हस्ते शाळेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यी कार्यक्रमाला उपस्थित होते.