
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी निवडण्या बाबत व त्या संबंधी विचार वीनीमय व चर्चा करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वा शिवस्मारक या ठिकाणी बोलाविण्यात आली असल्याची माहिती माजी आमदार दिगंबरराव पाटील व माजी सभापती मारुतीराव परमेकर यांनी आज दुपारी शिवस्मारक खानापूर या ठिकाणी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नामुष्की जनक दारुण पराभव स्वीकारावा लागला, त्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी, काही दिवसापूर्वी एक बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. व पुढील कार्यकारिणी निवड करण्यासाठी पुढील बैठक बोलाविण्याची जबाबदारी माजी आमदार दिगंबरराव पाटील व तालुका पंचायतीचे माजी सभापती मारुतीराव परमेकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्या संदर्भात माजी आमदार दिगंबरराव पाटील व माजी सभापती मारुतीराव परमेकर यांनी आज दुपारी 11 वा राजा शिवछत्रपती स्मारक या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन, सोमवार दि 3 जुलै रोजी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून त्या बैठकीत वेगवेगळे मुद्दे मांडण्यात येणार असून सर्वांनी आपापले विचार मांडावेत त्याच्यावर चर्चा करण्यात येईल व त्यानंतर परत एक बैठक घेण्यात येईल व त्यात कार्यकारणीची निवड करण्यात येईल असे सांगितले आहे.
यावेळी दिगंबर पाटील माहिती देताना म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समिती ही फक्त निवडणुकीसाठी तयार झालेली संघटना नाही. सीमा भागात मराठी माणसाचे अस्तित्व आहे. मराठी माणसांचे राज्य चालते, हे दाखवीण्यासाठी व सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तयार झालेली ही संघटना आहे. त्यासाठी लवकरात लवकर कार्यकारणी ची निवड करावी लागेल, गेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले परंतु राजीनामे दिले म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. जोपर्यंत नवीन कार्यकारिणी निवड होत नाही तोपर्यंत ती कार्यकारिणी काळजी वाहू कार्यकारिणी म्हणून अस्तित्वात असते त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सोमवार दि 3 जुलै रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्व कार्यकर्त्यांचे विचार व मुद्दे विचारात घेऊन पुढे परत एक बैठक घेऊन त्यात कार्यकारणीची निवड करण्यात येईल.
माजी सभापती मारुतीराव परमेकर माहिती देताना म्हणाले खानापूर तालुक्यात 60 ते 65 टक्के जनता मराठी भाषिक आहे परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीला नामुष्की जनक पराभव स्वीकारावा लागला नैतिक जबाबदारी स्वीकारून कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्याचा अधिकार आपणाला व माजी आमदार दिगंबरराव पाटील यांना देण्यात आलेला आहे. सीमा प्रश्नाच्या व सीमा चळवळीच्या दृष्टीने तसेच मराठी भाषिकावर लादलेली कन्नड शक्ती, व मराठी भाषिकांना न्याय हक्क मिळविण्यासाठी कार्यकारणीची निवड ताबडतोब होणे गरजेचे आहे. त्यासाठी 3 जुलै रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत अशी माहिती दिली.
