
खानापूर : हिंडलगा येथे 1 जूनला हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, तसेच निवडणुका संपल्या आसल्या तरी चळवळ मात्र सुरूच आहे. त्यामुळे उदासीनता झटकून सर्वांनी सीमा चळवळीत पुन्हा समाविष्ट व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले.
शिवस्मारक येथे तालुका म. ए. समितीची बैठक झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 1 जून 1986 ला कन्नडसक्तीविरोधात झालेल्या आंदोलनावेळी गोळीबारात हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर तालुक्यातून समिती कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 1) सकाळी आठला शिवस्मारक येथे मोठ्या संख्येने जमावयाचे आहे. चळवळीला बळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले.
यावेळी मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, निरंजन सरदेसाई, कृष्णा कुंभार, जगन्नाथ देसाई, विठ्ठल गुरव, शशिकांत सडेकर, म्हात्रू धबाले, पांडुरंग सावंत आदींसह इतर कार्यकतें उपस्थित होते.
