खानापूर : समितीने कधीही जय-पराजयाची भीती बाळगली नाही, न्यायसंगत लोकलढ्याचा भाग म्हणून निवडणुका लढविल्या आणि अनेकदा जिंकल्याही पराभवातून नवी उभारी घेण्याची किमया अनेकदा करून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने यत्किंचितही निराश न होता मराठीचे संवर्धन आणि सीमाप्रश्नासाठी आजन्म कटिबद्ध राहा, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले..
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर विचारमंथन करण्यासाठी आज तालुका समितीच्या कार्यकारिणीची बैठक झाली.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, कार्यकत्यांनी सर्व शक्तिनिशी समितीच्या प्रचारासाठी प्रामाणिक योगदान दिले. विरोधकांनी ओतलेला पैसा आणि आमिषांच्या पुढे मराठी माणसांची ताकद कमी पडली. मुरलीधर पाटील म्हणाले, पराभवासाठी कोणताही कार्यकर्ता आणि नेताही जबाबदार नाही. राष्ट्रीय पक्षांनी पैशाचा पाण्यासारखा वापर केला. तुलनेत मराठी माणसांचे बळ कमी पडले. समितीने आपल्याला उमेदवारी देऊन दिलेला सन्मान आयुष्यभर विसरणार नाही.
जयराम देसाई बोलताना म्हणाले की, केवळ निवडणुकीत जनतेसमोर जाऊन उपयोग नाही. चुका झाल्या त्या मान्य करून जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांना नेटाने सामोरे जायला हवे. विलास बेळगावकर म्हणाले, ता. पं. आणि जि. पं. निवडणुकांत चुकांची पुनरावृत्ती टाळून काम केल्यास गतवैभव मिळवता येते. या पराभवाने समिती कार्यकर्ता खचणार नाही. आबासाहेब दळवी सीताराम बेडरे, विठ्ठल गुरव, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, महादेव घाडी नारायण कापोलकर, रणजित पाटील, आदींनी मते मांडली.
यावेळी डी. एम. गुरव म्हणाले, हा पराभव आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 55 ते 60 हजार मराठी भाषिक मते राष्ट्रीय पक्षांकडे वळली आहेत, त्याचा नेहमी चिन्हांच्या घोळाचा सामना करावा लागतो. तो टाळण्यासाठी समितीच्या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी संपर्क कार्यालय सुरू ठेवावेत.
गावागावांत बूथ कमिट्या स्थापन करा.
म. ए. समितीचे उपाध्यक्ष कृष्णा कुंभार म्हणाले, ही आरोप करण्याची वेळ नाही. ऐनवेळी उमेदवार निवड होत असल्याने त्याला प्रचाराला पुरेसा वेळ मिळणे कठीण जात आहे. पुढील निवडणुकीसाठी आताच उमेदवार निवडल्यास पाच वर्षे प्रचारासाठी वेळ मिळेल. गावागावांत बूथ कमिटी स्थापन करून समिती संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. सक्षम विरोधक म्हणून चोख भूमिका बजावल्यास जनता समितीचा विचार केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी बैठकीला यशवंत बिर्जे, नारायण लाड, सीताराम बेडरे आदी. नारायण लाड, कृष्णा मन्त्रोळकर, रमेश , धबाले, शंकर गावडा, संजय पाटील, संतोष पाटील, डी. एम. भोसले, म्हात्रू धबाले, मारुती परमेकर, अमृत शेलार. व आदीजन नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.