
नवरदेव ऽऽ शुभ मंगल सावधान …
खानापूर : प्रतिनिधी (उमेश देसाई) गेल्या काही वर्षात मुलींच्या संख्येत काही अंशी घट झाली. मुलगी नको, मुलगाच हवा या मानसिकतेचा परिणाम सध्या सगळीकडेच पाहावयास मिळत आहे. मुलाची चाळीशी जवळ आली तरीही अद्याप कित्येक जण कुमार जीवनच जगत आहेत. लग्न करण्याची गडबड असली तरी मुली मिळणे कठीण बनते आहे. याचाच फायदा काही ठग उठऊ लागले आहेत. खानापूर तालुक्यातही काही ठग कार्यरत झाले असून नववरांना हेरुन मुलगी दाखविण्याच्या थापा मारून त्यांना फसविले जात आहे. यामुळे नवरदेव, शुभमंगल सावधान…! म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरातील शिवस्मारक परिसरात तालुक्याच्या चारी भागातील काही ठग नवयुवकांना दररोज हेरत अहेत. तहसिलदार कार्यालय परिसरात या ठगांची जास्तीत-जास्त उठ-बस असून थोडी ओळख होताच आपण लग्न जमविण्याचे कामे करतो अशी आपली ओळख करून देतात. या ओळखीतूनच सावजाला आपल्या ताब्यात घेवून तुमच्या मुलाला आपल्याला भेटवा, लग्न जमवितो. असे सांगितले जाते. मुलग्याची भेट होताच शाळा मुलीविषयी माहिती देवून फोटो दाखविला जातो. नाकी-डोळी छान गोरी- गोबडी मुलगीचा फोटो पाहताच मुलगाही हबकतो आपसूकच मुलगी दाखवा असा शब्द मुलाच्या तोंडून येतो आणि दुसरा एक ठग तेथे ‘दत्त’ म्हणून उभा राहतो. ठगाला ठग मिळताच हेच एजंट असून मुलगी दाखविण्यास त्यांना दोन हजार रुपये द्या असा सल्ला दिला जातो. दोन हजार रुपये खिशात पडताच गाडी खर्च व जेवणावळ मिळून पुन्हा खर्च घेतला जातो. चार-पाच हजारांने खीसा गरम होताच मुलीला मुलगा पसंत नसल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी तीच मुलगी तिसऱ्याला दाखविली जाते. अशा पध्दतीने एकच मुलगी दिवसातून तीन ते चार मुलाना दाखवून हे ठग “लक्ष्मी” कमावू लागले आहेत.
जांबोटी क्रॉसवर एक भामटा याकामी “नारायण- नारायण” करत मुलांची चांगलीच लुबाडणूक करीत आहे. जांबोटी, गुंजी, नंदगड, बिडी, हलशी परिसरातील कांही भामटे याकामात तरबेज बनले अहेत. पश्चिम भागातील एका गावातील मुलीच्या बापाला तर एका ठगाने दारूच्या कॉर्टरच्या धुंदीवरच नाचविण्यास सुरवात केली अहे. या परिसरात जन्मलेली ही मुलगी दोन वर्षांत सोन्याचे अंड देणारी कोंबडीच बनली आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे दोनशे ते अडीचशे मुलांसमोर जावून मी लग्नाची आहे. हे सांगण्याचे भाग्य या मुलीला स्वतःच्या बापामुळे व त्या भामट्यामुळे मिळाले आहे. आज देखील संबधित् मुलीला दिवसातून तीन – चार स्थळे चालून येतच आहेत. यामुळे संबधीतांनी या मुलीची “पूजा” न बांधली तरच नवल.
परिणामी मुलाच्या बापाचा खिसा रिकामी होत असला तरी तालुक्यातील काही एजंट मात्र शुभ मंगल जमविता जमविता आपल “मंगल” घडवून घेत आहेत हे मात्र नक्की!
