माओवाद्यांचा क्रूर कृत्य, गावातून उचलून नेलं नंतर शेकडो लोकांसमोर दोघांना फासावर लटकवलं,
गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे, अशातच माओवाद्यांनी दोन जणांची निघृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोली लगतच्या छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी 2 जणांचे अपहरण केले. त्यानंतर जन अदालत लावून शेकडो नागरिकांच्या समक्ष झाडाला लटकवून गळफास देऊन हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये गडचिरोली जिल्ह्याला लागून बीजापूर जिल्हा असून, त्या ठिकाणी जप्पे मरका गावातील माडवी सुजा आणि पोडियम कोसा या दोन नागरिकांसह मिरतुर येथील एका विद्यार्थी अशा 3 जणांचं माओवाद्यांनी अपहरण केलं होतं.

त्यानंतर, गावकऱ्यांची जन अदालत जंगलात भरवली. नंतर या ठिकाणी मांडवी सुजा आणि पोडियम कोसा या दोघांना सगळ्या गावकऱ्यांच्या समक्ष झाडाला फाशी देऊन ठार मारण्यात आले. तर त्या विद्यार्थ्याला यापुढे पोलिसांसाठी खबऱ्याची भूमिका न बजावण्याची धमकी देऊन सोडण्यात आले आहे.
माओवाद्यांनी त्या ठिकाणी एक पत्रक सोडले असून त्यात दोन्ही मृतक गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांचे खबरे म्हणून कार्य करत असल्याचे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यासोबतच लगतच्या अनेक गावांना ही धमकी देण्यात आली असून पोलिसांचे खबरे बनवू नका अन्यथा अशाच पद्धतीने मृत्यूला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. माओवाद्यांनी स्वतःच या दोन्ही मृतांचे फोटो काही निवडक प्रसारमाध्यमांना पाठवले आहेत.

