बंगळुरु : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकतंच फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. त्यात गडकरींना कर्नाटकच्या बेळगावातील हिंडलगा तुरुंगातून धमकावण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लागलीच कर्नाटक पोलिसांनी हिंडलगा तुरुंगाच्या दिशेनं धाव घेतली. त्यांनी गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याची चौकशी सुरू केली आहे.
हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं आपली ओळख कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून करवून दिली. आपलं नाव जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी असं सांगितलं. या प्रकरणी आता गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनी कर्नाटक पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
माध्यमांशी बोलताना गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, ‘मंत्री गडकरींना धमकीचा फोन करणाऱ्याची चौकशी सुरु असून आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल. कारागृह आणि पोलीस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.’
येत्या तीन महिन्यांत राज्यभरातील सर्व तुरुंगांमध्ये 5G सेवा सुरु करणार असून कारागृहात जॅमर बसवले जाणार आहेत. तुरुंगातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या कॉल्सवर आता बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल आणि तुरुंग परिसरात वेळोवेळी तपासणी केली जाईल, असं गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितलं.