
25 डिसेंबरला संपूर्ण जगात ख्रिसमस हा सण उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे. असं असतानाच गुजरातमधील वडोदरा इथे मात्र एका सांताक्लॉजला लोकांनी बेदम मारहाण केली आहे. सदर घटनेनंतर दोन वेगवेगळ्या धर्मियांमध्ये वाद निर्माण झाला असून ख्रिश्चन धर्मियांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलीसांनी त्यांची मागणी मान्य केली असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
वडोदरा येथील मरकपूरमध्ये एका कॉलनीत हा व्यक्ती सांताक्लॉजच्या वेशभूषेत त्या कॉलनीतील ख्रिश्चन समुदायाला भेटण्यासाठी गेला होता. सदर कॉलनीमध्ये सर्वच धर्माचे लोक राहत असून सांताक्लॉज मुलांना चॉकलेट वाटत होता. सांताक्लॉजची ही कृती त्या कॉलनीतील इतर धर्मीय लोकांना आवडली नाही आणि त्यांनी या सांताक्लॉजला बेदम मारहाण केली त्यात हा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार या घटनेत एकूण चार लोक जखमी झाले आहेत.
सांताक्लॉज चॉकलेट वाटत असताना त्याला इतर धर्मीयांनी पाहिलं आणि त्यांनी त्या सांताक्लॉजला आपली वेशभूषा काढण्यास सांगितली. त्याने त्यास नकार दिल्याने त्यास मारहाण केली. ख्रिश्चन धर्मीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांना एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी अशी धमकी दिली आहे की, “हा त्यांचा परिसर असून इथे असे काही चालणार नाही.” . सदर घटनेची तक्रार देणार आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
