स्व. मारुती दळवी : कर्तृत्व, संस्कार आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास.
“गेलात आम्हा सोडून, राहिल्या मागे आठवणी…
आठवणी मनी, स्मरणी; मार्गक्रमू या जीवनी…”
माणूस जातो, पण त्याचे विचार, संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकीची ऊब कायम स्मरणात राहते. आमच्या दळवी कुटुंबाचा भक्कम आधारवड, मणतुर्गे पंचक्रोशीतील सर्वपरिचित व आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि माझे लाडके काका, स्वर्गीय मारुती नारायणराव दळवी यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने आमच्या कुटुंबावर 23 जून रोजी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याने केवळ आमचे कुटुंबच नव्हे, तर त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा प्रत्येकजण पोरका झाला आहे. शुक्रवार दिनांक 3 जुलै अकराव्या दिवसानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात…..

4 मे 1957 रोजी मणतुर्गे येथे कै. नारायणराव सदाशिवराव दळवी आणि कै. लक्ष्मीबाई नारायणराव दळवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांचे संस्कार त्यांनी आत्मसात केले. प्राथमिक शिक्षण मणतुर्गे येथे, तर माध्यमिक शिक्षण खानापूर येथील मराठा मंडळ हायस्कूलमध्ये पूर्ण केले.
सन 1981 मध्ये मणतुर्गे ग्रामीण टपाल कार्यालयात पोस्टमास्तर म्हणून त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कामकाज आणि मितभाषी स्वभावामुळे त्यांनी सहकारी, अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
नोकरीसोबतच त्यांनी शेतीची जबाबदारीही तितक्याच निष्ठेने पार पाडली. भजन, नाटक आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांविषयी त्यांना विशेष प्रेम होते. एक उत्कृष्ट नाट्यकलाकार म्हणून त्यांनी गावातील अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा होता, पण विचार मात्र अत्यंत उंच आणि दूरदृष्टीचे होते.
आयुष्यभर त्यांनी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि सुखांचा त्याग करून कुटुंबाच्या आनंदासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत परिश्रम घेतले. कितीही मोठे संकट आले तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जात त्यांनी कुटुंबाला खंबीर आधार दिला.
माझ्यासाठी ते केवळ काका नव्हते; ते माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आयुष्यभर सावली देणारे वटवृक्ष होते. आदर्श भाऊ म्हणून त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहून संपूर्ण कुटुंब एकसंघ ठेवले.
कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. गावातील चांगळेश्वरी हायस्कूलच्या संचालक पदी ते कार्यरत आहेत त्याचबरोबर हायस्कुलच्या उभारणीतही सिंहाचा वाटा आहे आणि सरकारी मराठी मुलांची शाळा सुधारणा कमिटीवर अनेक वर्षे कार्य केले. तसेच गाव पंच कमिटी व पांडुरंग सप्ताहासह विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच मोलाचे योगदान दिले. त्याबरोबर सह्याद्री व के एम एफ दूध संघावर संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. प्रेमळ, दिलदार आणि आपुलकीच्या स्वभावामुळे गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना प्रेमाने “डॅडी” म्हणून हाक मारत असत. त्यांनी जोडलेली माणसे हीच त्यांच्या आयुष्याची खरी श्रीमंती होती.
आज ते आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेले संस्कार, कष्टाची शिकवण, प्रामाणिकपणाची वाट, स्वाभिमानाने जगण्याचा आदर्श आणि माणुसकीचा अमूल्य वारसा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात सदैव जिवंत राहील. त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आमच्या आयुष्याचा कायमचा दीपस्तंभ राहतील.
“तुमचे प्रेम, तुमचे संस्कार, तुमचे कर्तृत्व आणि तुमच्या सहवासाच्या अमूल्य आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.
ईश्वर आपल्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो. तुमच्या पवित्र स्मृतींना आमचे विनम्र अभिवादन!”
-शिवानी (शीतल) उमेश पाटील.


