नळाला पाणी आल्याने अठरा वर्षीय विद्यार्थिनीने मोटर लावली. तेव्हा तिला विजेचा शॉक बसला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहरातील कसबा भागामध्ये घडली आहे
मोटरने पाणी भरताना विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बीड शहरातील कसबा भागामध्ये ही हृदय हेलावणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. जबरदस्त इलेक्ट्रिक शॉक बसल्याने १८ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला. शॉक बसताच तात्काळ तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तोवर तिने अखेरचा श्वास घेतला होता.
कोमल रामेश्वर शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. कोमलने पाणी भरण्यासाठी मोटर लावली होती. पाणी भरत असताना अचानक तिला विजेचा जबरदस्त धक्का बसला.
इलेक्ट्रिक शॉक बसताच कोमलने जोरदार किंकाळी मारली. तिचा आवाज ऐकताच घरातील लोक धावत तिच्याजवळ आले. कुटुंबीयांनी तात्काळ कोमलला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला होता.
१८ वर्षांच्या कोमलचा ऐन भरारीत मृत्यू झाला. ती सध्या इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या आपल्या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर मध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र आजूबाजूला पाणी साचलेले असल्याने आणि त्यात मोटर लावायला गेल्याने हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहितीमुळे समोर आले आहे.