राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत.
महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी शपथ घेतली होती. विशेष म्हणजे मुळचे उत्तराखंडचे असलेल्या कोश्यारी यांनी शपथ मराठीतून घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ दिली होती. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी हे अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत होते. त्यांची उचलबांगडी करण्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि त्यांच्या विरोधकांनी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.
काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे कोश्यारी वादात सापडले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.
कोण आहेत बैस?
- सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे.
- अटल बिहारी वाजपेयीच्या काळात केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून काम केलं.
- छत्तीसगडमधील रायपूरचे ते माजी खासदार आहेत.
या ठिकाणचेही राज्यपाल बदललेत
महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच याशिवाय डझनभर राज्यांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचाही राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थानचे मजबूत नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.