निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की आणि सीरियात आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
आतापर्यंत तुर्कीमध्ये एकाहून अधिक भूकंपाचे धक्के बसले असून, पहिला धक्का सोमवारी सकाळी बसला होता. तुर्कीमध्ये 20 हून अधिक वेळा धरणी कंप जाणवले. काहींच्या म्हणण्यानुसार 46 वेळा असे हादरे जाणवले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचं हे संकट तुर्कीसाठी भविष्यात आणखी मोठं आव्हान उभं करणारं ठरू शकतं. सध्याच्या घडीला इथं आलेल्या अतीप्रचंड तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारती कोसळल्या आहेत, तर काही इमारतींचा पाया कमकुवत झाला आहे. पहिल्या भूकंपाच्या हादऱ्यामध्ये ज्या इमारतींना फारशी इजा पोहोचली नव्हती, त्या इमारती दुसऱ्या हादऱ्यामध्ये कोलमडल्या.
परिणामी, इथं आलेल्या भूकंपांच्या हादऱ्यांनंतरही आलेल्या अनेक आफ्टरशॉकमुळं इथं जमिनीचा अंतर्गत भागच कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता भविष्यात इथं अनेक बांधकामं धोक्यात असल्याचं स्पष्ट होत आहे. थोडक्यात भूकंपाचा धक्का आला नाही, तरी इमारती कोसळून तुर्कीमध्ये आणखी जिवीत हानी होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
NDRF ची टीम तुर्कीला रवाना
तुर्कीमध्ये आलेलं संकट पाहता सध्या तिथं मदतीचा हात देण्यासाठी आणि बचावकार्यात हातभार लावण्यासाठी म्हणून गाझियाबाद येथील कमला नेहरुनगर स्थित एनडीआरएफची आठवी बटालियन तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली आहे. हिंडन एअरपोर्टगून ही 51 सदस्यी टीम मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वायुदलाच्या विमानानं तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली.