
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरतपणे संघर्ष करणारे बेळगावातील जेष्ठ समाजवादी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राम आपटे यांचे आज पहाटे (२३-१२-२२) त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. राम आपटे हे गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेले लढवय्ये नेते व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र एकीकरण समितीची केस लढणाऱ्या ॲड. हरीष साळवे यांच्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या केससंदर्भात महत्त्वाची कामगिरी बजावणारे व न्यायालयीन कामकाजाचे समन्वयक म्हणून काम पहाणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे समर्थक आज आपल्याला सोडून गेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगांव शाखेची स्थापना जवळपास 52 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांसह केली होती व तेव्हांपासून तेच समर्थपणे अध्यक्षपद सांभाळत होते. तळागाळातील लोकांची सेवा करण्यासाठी, स्वतःची जमा पुंजी रु. ५० लाख दान करून त्यांनी जीवनविवेक प्रतिष्ठान ही सामाजिक विश्वस्त संस्था स्थापन केली. यासोबत अन्याय निवारण मंच, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शोषण मुक्ती दल, जीवन शिक्षण प्रतिष्ठान अशा बेळगावतील अनेक सामाजिक संस्थांचे ते संस्थापक व आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
